पिंपळबन

" लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकसहभागातून हाती घेतलेला उपक्रम....!!  "

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याच्या उत्तरपूर्व सीमेवर वसलेले “कुडाळ” गाव. कुडाळच्या एका बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी निरंजना (कुडाळी) नदी आणि या नदीच्या तीरावर वसलेले गावचे आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर देवस्थान. पूर्वी या देवस्थान परिसरात पिंपळ आणि वड या वृक्षांच्या घनदाट अरण्यामुळेच या देवांना श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर हे नाव दिले गेले अशी आख्यायिका आहे. काळाच्या ओघात, पिंपळ आणि वड नाहीसे झाले पण आपल्या आराध्य दैवताचे महात्म्य जपण्याची संकल्पना कुडाळच्या युवकांच्या मनात डोकावली आणि त्यातूनच “पिंपळबन” संकल्पना जन्माला आली.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे आणि नैसर्गिक संकटे येवू लागली आहेत यातून केवळ वृक्षच सृष्टी वाचवू शकतात.वृक्ष लागवडीसाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातातच पण बहुतांशी हे प्रयत्न अपुरे पडतात अशावेळी निसर्गाला साद घालण्याची आपलीही जबाबदारी आहे. याच भावनेने कुडाळ येथील युवक संघटीत झाले तसेच त्यांच्या कार्यास जनसहभागाची साथ मिळाली.युवकांना लोकांच्या अपेक्षा कळून चुकल्या आणि “पिंपळबन” संकल्पनेस बळ मिळाले.पर्यावरणाचा असमतोल, वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे कुठेतरी थांबावे, भविष्यकालीन धोका टाळण्यासाठीच कुडाळमधील युवक आणि ग्रामस्थांच्या नैसर्गिक भावनेतून “पिंपळबन” ही संकल्पना जोर धरू लागली.

आपल्या पुढील येणाऱ्या भावी पिढ्यांना भविष्यकालीन भेट म्हणून कुडाळमधील विविध मंडळे,ग्रामपंचायत,गजराज युवक मंडळ,जेष्ठ नागरिक संघ व अनेक ग्रामस्थ यांच्या मदतीने गावात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली गेली, त्यांना भर उन्हाळ्यात मायेचे पाणी देऊन त्यांचा जीव जागवला.या झाडांची निगा राखताना त्यांचे संवर्धन करताना “पिंपळबन” च्या कार्याची खरी सुरुवात झाली

जून 2019, पावसाळ्यात श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर परिसर पिंपळबनयुक्त करण्याचा निर्धार युवकांनी केला.आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात २५० पिंपळाची रोपे तसेच वड, चिंच, उंबर, कांचन, आवळा, चाफा व शोभिवंत फुलझाडे अशी अनेक रोपे लावण्यात आली.पिंपळबनासाठी ग्रामस्थांचे भक्कम पाठबळ मिळाले.पावसाळ्यात लावलेली झाडे उन्हाळ्यात जगवण्यासाठी पर्यावरण प्रेमी आणि युवकांची धडपड ग्रामस्थांना भावली त्यामुळेच“पिंपळबन” या पर्यावरण उपक्रमास सर्व समाजातून उत्स्फूर्थपणे प्रतिसाद मिळाला.

कुडाळ गावात आकारास येत असलेले “आपलं पिंपळबन” म्हणजे श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम होय.ग्रामदैवत श्री पिंपळेश्वराचे आराध्य वृक्ष पिंपळ, या वृक्षास विविध कारणामुळे असणारे पौराणिक महात्म्य तर दुसरीकडे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणारा वृक्ष म्हणून वैज्ञानिक महत्व असा श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम “आपलं पिंपळबन” या उपक्रमात झालेला आहे. “आपलं पिंपळबन” निर्माण होत असतानाच शहरीकरणकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या कुडाळ गावाला एक नवी ओळख निर्माण करून देण्याची संकल्पना निसर्गप्रेमी युवकांच्या मनात आली आणि “आपलं पिंपळबन” बरोबरच निसर्गप्रेमी उद्यान निर्माण करून बालगोपाल आणि जेष्ठ नागरीक,महिला यांना रमणीय निसर्गाचा आस्वाद घेता यावा यासाठी “बालोद्यान” ही संकल्पना पुढे आली.

श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या जागेवरच हे बालोद्यान साकार होत आहे.तीव्र उतार, ओबड धोबड व पडीक जागा विकसित करण्याचे मोठे आव्हान संयोजाकापुढे होते.परंतू ग्रामस्थांची एकजूट, एकमुठ आणि दानशूर व्यक्तींनी दिलेले आर्थिक पाठबळ यामुळेच पिंपळबन आणि बालोद्यानाची यशस्वी वाटचाल सुरु आहे तसेच युवक, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या निरामय आरोग्यासाठी आपण बालोद्यान बरोबर “ओपन जिम” पण सुरू करत आहोत.

जीवनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन फक्त हि झाडेच निर्माण करू शकतील त्यासाठी आजच झाडे लावावी लागतील आणि त्यांचे संवर्धन करावे लागेल हा विचार रुजवण्यासाठी लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी व लोकसहभागातून साकारलेले “आपलं पिंपळबन” व “बालोद्यान” हे प्रकल्प होय.

संत तुकारामांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती” याच संकल्पनेतून झाडे लावण्याची आणि ती जागवण्याची उमेद कुडाळ ह्या आमच्या गावात अविरत, अखंड आणि समर्थपणे सुरु आहे.

“आपलं पिंपळबन” आणि “बालोद्यान” प्रकल्प सर्वांसाठी आदर्श, मार्गदर्शक आणि कुडाळसाठी एक अभिमानास्पद बाब ठरेल यात कोणतीही शंका नाही...

“आपलं पिंपळबन” आणि “बालोद्यान” प्रकल्पासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे....नक्की भेट द्या.... आपले स्वागत आहे

अभिप्राय